पुणे : मान्सूनने रविवारी केरळमध्ये धडक दिल्यानंतर त्याच्या पुढील प्रवासास अनुकूल वातावरण निर्माण झाले असून, मऱ्हाटी मुलखावर ६ ते ९ जून या काळात मान्सूनची आनंदसरींची पहिली बरसात होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविण्यात आला आहे. सध्या मान्सून अरबी समुद्राचा मध्य भाग, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या काही भागात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
दक्षिण आणि बंगालच्या उपसागरातून पुढे मान्सून हा वेगाने प्रवास करीत आहे. येत्या ३ ते ५ दिवसांत मान्सून केरळमधील उर्वरित भाग, दक्षिण अरबी समुद्र, तामिळनाडू, कर्नाटकचा आणखी काही भाग, तसेच ईशान्येकडील राज्यांत वेगाने वाटचाल करेल, असा हवामान अंदाज आहे. यामध्ये अडथळा न येता पुढे सरकण्याचा वेग कायम राहिल्यास मान्सून महाराष्ट्रात ६-७ जून रोजी दाखल होऊ शकतो.
गोव्यात तुरळक पाऊस
गेल्या २४ तासात कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडला, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात हवामान कोरडे राहिले होते. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विजाही कडाडणार
पुढील २४ -३६ तासात मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. त्यानंतर २ व ४ जून रोजी कोकण व गोव्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक काही इतर ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात व विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा हवामान अंदाज आहे.