यशोगाथा: पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग हा कायमचा दुष्काळी भाग म्हणुन ओळखला जातो,या भागातील तरुणांच्या हातात पदव्या असुनही नोकऱ्या नाहीत, पण नोकरी मिळेना म्हणुन नाराज न होता, प्रयत्न, जिद्द, आणि परिश्रमाच्या बळावर दगडवाडीच्या तुळशीदास शिंदे या तरुणाने दुध धंदा करुन जणु आपले आयुष्यच बदलून टाकले.पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात गर्भगिरी डोंगराच्या कुशीत अनेक लहान मोठी गावे वसलेली आहेत, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुमित जिद्दी तरुणांची कमतरता नाही. (यशोगाथा) पाथर्डी तालुक्यातील करंजीपासुन अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या व डोंगराच्या कुशीत वसलेल्या दगडवाडी गावातील तुळशीदास मारुती शिंदे या तरुणाने उच्च शिक्षण घेवुन पदवी तर मिळविली, पण नोकरीच मिळेना म्हणुन हताश न होता दुध धंदा करण्याचा निर्णय घेतला. अपार जिद्द, परिश्रम आणि इच्छाशक्तीच्या जोरावर परिसरात नावलौकीक मिळविला. आज तुळशीदास शिंदे यांच्याकडे लहान-मोठ्या ३२ गाया असुन त्यात डेन्मार्क, जरशी, एचएफ, एबीएस असा नामांकित जातीच्या गाया आहेत. महिन्याला गायांचा खर्च जाता तुळशीदास शिंदे हा तरुण आज ३ लाख रुपये महिना मिळवीत आहे. दररोज २०० लिटरच्या त्यांचे दुधाचे संकलन आहे. तुळशीदास शिंदे यांनी गायासाठी मुक्त संचार गोठा तयार केला आहे. तुळशीदास शिंदे हे २१ वर्षापासुन दुधाचा धंदा करीत आहेत. त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नी सौ. राजश्री तुळशीदास शिंदे तसेच मुलगा गिरीश व आदित्य हे मदत करतात. गायांच्या दुधाबरोबरच शेणखतांचाही मोठा उपयोग शेतीसाठी होत आहे. गायांच्या सुरक्षित व सकस खुराकासाठी मुरघास बनविण्याचे तालुक्यात पहिले मशिन तुळशीदास शिंदे यांनी आणलेले आहे. त्याचा गायांचे खाद्य तयार करुन साठविण्यास मोठी मदत होते. त्यांच्या गायांचा गोठा व गाया पहाण्यासाठी पंजाबच्या काही शेतकऱ्यांनी यांच्या गोठ्यास भेट दिली होती. कोणताही व्यवसाय चिकाटीने, परिश्रम घेऊन केल्यास निश्चित यश मिळु शकते याचे उदाहरण व आदर्श परिसरातील तरुणासमोर तुळशीदास शिंदे यांनी ठेवला आहे. पाथर्डी तालुक्यासारख्या दुष्काळी भागातील अनेक तरुण पदव्या घेवुन नोकरी लागत नाही म्हणुन निराश व हताश झालेले दिसतात, या तरुणांनी शेतीला जोडधंदा म्हणुन उद्योग केले पाहिजेत. कोणत्याही धंद्यात कष्ट केले तर यश मिळतेच-तुळशीदास शिंदे(यशोगाथा)
हे हि वाचा : पाणंद रस्ता योजना