साग रोपांची लागवड 2022 - डिजिटल शेतकरी

साग रोपांची लागवड 2022

साग लागवडीसाठी थोडीफार चढ-उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागत असते. खडकाळ किंवा मुरमाड जमिनीत साग चांगल्या प्रकारे वाढत असते .आणि  काळी चिकट माती असेल, तर सागाची वाढ समाधानकारक होत नाही. तसेच उथळ, निचरा न होणारी, फार दलदलीची जमीन साग लागवडीस अयोग्य असते.

सागाचे बियाणे पेरून, रोपांची लागवड करून किंवा खोडमूळ (स्टंप) लावून लागवड करता येत असते. सागाच्या बियांवरील कवच मऊ करून अंकुर येण्यास सुलभ करण्यासाठी पावसाळ्यात मोकळ्या जागेत सिमेंटच्या चबुतऱ्यावर किंवा टणक पृष्ठभागावर बियाणे पसरावे व दररोज दाताळ्याने खालीवर करात राहावे. असे केल्याने सुमारे चार ते सहा आठवड्यांनंतर बियांवरील कवच मऊ होऊन बी रुजण्यास मदत होत असते आणि  बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्यापासून सागाची रोपे पॉलिथिन पिशवीत अथवा गादीवाफ्यावर करावीत.

पॉलिथिन पिशवीत रोपे तयार करण्यासाठी एक भाग माती, एक भाग वाळू व एक भाग शेणखत यांचे मिश्रण करून ते 10 x 20 सें.मी. पिशवीत बीजप्रक्रिया केलेले बी पेरत असतात. गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी 12 मी. x 1 मी. आकाराच्या वाफ्यावर दहा सें.मी. अंतरावर व पाच सें.मी. खोलीवर प्रक्रिया केलेले बियाणे पेरून घावे.

खोडमूळ (स्टंप) बनविण्यासाठी एक वर्षानंतर रोपे गादीवाफ्यावरून उपटावीत  आणि तीक्ष्ण धार असलेल्या चाकूने मुळाकडील 15 ते 20 सें.मी. भाग ठेवून बाकीचा भाग कापून टाकण्यात यावा आणि तसेच मुळाचा खोडाकडील 1.5 ते 2 सें.मी. भाग ठेवून बाकीचा भाग कापावा. हे करताना तिरपा एकच घाव घातला जावा. पाने व छोट्या मुळ्या काढाव्यात अन  तयार केलेले खोडमूळ जितक्‍या लवकर रोपवनात लावले जाईल, तितके चांगले.

जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर 2 x 2 मीटर अंतरावर 30 x 30 x 30 सें.मी आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये सागाची लागवड करून घावी. सागाचे स्टंप घट्ट लावावेत आणि  लागवड केल्यानंतर स्टंपच्या शेजारी पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. सागाची वाढ जोमाने होण्यासाठी प्रति रोप दहा ग्रॅम नत्र व दहा ग्रॅम स्फुरद अळी पद्धतीने घालावे. सागाची लागवड केल्यानंतर पावसाळ्यानंतर एक वर्षापर्यंत पाण्याची आवश्‍यकता असते आणि  प्रति वर्षी सागाची उंची साधारणपणे 1 ते 1.5 मी. व घेर दोन ते पाच सें.मी.ने वाढत असतो.

1 thought on “साग रोपांची लागवड 2022”

  1. साग स्टंपची लागवड पहारीने किंवा टोकदार खोच्याने 6 सेमी. ते 8 सेमी. होल घेऊन त्यात स्टंप खोऊन बाजूने मातीने घट्ट दाबून घ्यावी.5 ते 6 दिवसात त्या स्टंपला दोनतीन फुटवे येतात.त्यातील जोमदार एकच ठेऊन इतो सरळ वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित करावे.

    Reply

Leave a Comment