नागपूर : जलप्रकोप गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागपूर ग्रामीण तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे आणि अशातच शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्यासुमारास मंगरूळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ७० लोकांची वस्ती असलेल्या जुनापाणी गावावर संकट कोसळले आहे. गावाशेजारी असलेल्या तलावाचा बांध फुटल्याने सर्वत्र हाहाकार उडाला आणि तलावाचे पाणी गावात शिरल्याने गावातील लोकांनी जीव वाचविण्यासाठी टेकडीकडे धाव घेतली. मात्र, पुराच्या पाण्याने गावातील १६ घरांतील अन्न-धान्याचे प्रचंड नुकसान झाले व तसेच गावातील १३ हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याखाली आले आणि याशिवाय १८१ पाळीव जनावरे वाहून गेली.
गुरुवारी मध्यरात्रीनंतर कोसळलेल्या मुसळधार पावसाने जुनापाणी येथील तलाव ओव्हरफ्लो झाला होता आणि शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान बांध फुटल्याने तलावाचे पाणी गावात शिरले होते. येथील ग्रामस्थ झोपेत असतानाच गावातील १८१ पाळीव जनावरे वाहून गेली आहे. यामध्ये १८ गाई, ५ बैल, ७१ बकऱ्या, १ वासरू, ८६ कोंबड्यांचा समावेश यामध्ये आहे. तलावाचे पाणी गावातील १६ घरांत शिरले आणि याशिवाय शिवारातील १३ हेक्टर क्षेत्रातील कापूस आणि तूर पिकाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे तहसीलदार आशिष वानखेडे यांनी जुनापाणी गाठले आहे. ग्रामस्थांना धीर देत मदतीचे आश्वासन दिले गेले आहे. गावातील नुकसानीचा अहवाल मंडळ अधिकारी सुधाकर राठोड व तलाठी अल्का मुळक यांनी तालुका प्रशासनाला सादर केला गेला आहे.