ना टीव्ही, ना पंखा शेतकऱ्याला आले चक्क १ लाखाचे वीजबिल; महावितरणचा भोंगळ कारभार
जिवती (चंद्रपूर) : वीजबिल घरी केवळ दोन बल्ब, ना पंखा, ना टीव्ही विजेचा वापर केवळ २० युनिट तरीही वीज वितरण कंपनीने एका गरीब शेतकऱ्याला चक्क एक लाख ३८० रुपयांचे वीज बिल पाठविल्याचा प्रकार जिवती तालुक्यात समोर येत आहे. यावरून विद्युत विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळत आहे. जिवती येथील केशवराव भिमू कोटनाके यांचे लहानसे कुडाचे घर आहे आणि या घरात ना टीव्ही, ना पंखा, ना कूलर व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू नहीत.
घरात उजेडासाठी विजेचे दोन बल्ब आहेत आणि तरीही त्यांच्या या वीजपुरवठा देयकावर फक्त २० युनिट वीज वापराचे एक लाख तीनशे ऐंशी रुपयांचे वीजपुरवठा देयक महावितरण कंपनीकडून प्राप्त झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेले वीजपुरवठा देयक पाहून केशवराव कोटनाके यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी तातडीने महावितरणचे कार्यालय गाठले आणि तेव्हा अधिकाऱ्यांनी ४४ हजार २९० रुपये इतके वीज बिल करून दिले; परंतु इतके वीजपुरवठा देयक भरायचे तरी कसे, असा प्रश्न आता कोटनाके यांच्यासमोर उभा आहे.