ठाकरेंना शिंदेंचा ‘खास’दार धक्का; १२ खासदारांसह मुख्यमंत्र्यांचे दिल्लीत आज जोरदार शक्तिप्रदर्शन!
मुंबई /नवी दिल्ली : ठाकरेंना मोठा धक्का शिवसेनेच्या ४० आमदारांचे बंड घडवून आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे राज्यातील १८ पैकी १२ खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता असून मुख्यमंत्री शिंदे हे आज मंगळवारी त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री शिंदे सोमवारी दिल्लीला रवाना झाले आहे. मंगळवारी दिवसभर ते दिल्लीत असतील आणि ते शिवसेनेच्या बंडखोर खासदारांची बैठक घेऊन आमचीच मूळ शिवसेना असल्याचा दावा करतील व एनडीएमध्ये त्यांना अधिकृतपणे सामावून घेतले जाईल, असे मानले जात आहे. आमदारांच्या बंडाबाबतही त्यांनी हीच भूमिका घेतली होती आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत हे पक्षाचे लोकसभेतील नेते असून राजन विचारे हे प्रतोद आहेत. त्यांच्या जागी राहुल शेवाळेंची गटनेतेपदी, तर भावना गवळी यांची प्रतोदपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तविली आहे. खासदारांनी वेगळी चूल मांडल्यास ठाकरे गटास कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागनार आहे.
शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता असलेले खासदार
राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, प्रतापराव जाधव, भावना गवळी, कृपाल तुमाने, संजय मंडलिक, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, सदाशिव लोखंडे हे खासदार.
ठाकरेंसोबतचे खासदार
अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय (बंडू) जाधव हे खासदार.