लागवडीसाठीचे हवामान व लागवड हंगाम
कांदा लागवड रब्बी हंगामात कांद्याची लागवड करणे हे जास्त फायद्याचे ठरत असते. कांदा लावल्यापासून काही दिवस कांद्याला थंड हवामान हवे असते तर त्यानंतर कांद्याची वाढ होताना हवामानातील तापमान हे थोडे जास्त असेल तर कांद्याच्या कंद वाढीला त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या आस-पास कांदा लागवड केली तर त्यावेळच्या थंडीचा उपयोग होतो आणि जानेवारी महिन्यातील स्वछ सूर्यप्रकाशामुळे कांदा चांगला पोसला जात असतो.
त्याचसोबत महाराष्ट्रामद्धे खरीप हंगामात व उन्हाळी हंगामात देखील कांदा लागवड केली जात असते. खरीप हंगामात लागवड करताना जुन-जुलै महिन्यात करावी तर उन्हाळी हंगामात कांदा लागवड जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करत असतात.
जमीन व पूर्वमशागत
कांदा लागवडीसाठी मध्यम ते कसदार जमीन उपयुक्त ठरत असते आणि ही जमीन पाण्याचा निचरा करणारी व भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये सेंद्रिय घटक चांगल्या प्रमाणात असावेत ज्यामुळे कांदा पिकाची उत्तम वाढ होत असते.
लागवडीसाठी जमीन तयार करताना जमीनीची उभी आडवी नांगरणी करून कुळवाच्या पाळया देऊन ढेकळे फोडून घ्यावीत आणि जमिन भूसभुशित करून घ्यावी. जमिनीत एकरी १५ टन शेणखत टाकावे त्यामुळे कांद्याला आवश्यक असलेले सेंद्रिय घटक जमिनीत उपलब्ध होत असतात.
वान व बियाणे
बसवंत ७८० : खरीप व रब्बी हंगामासाठी ही जात योग्य असून या जातीचा रंग गडद लाल असतो आणि कांदे आकाराने मध्यम ते मोठे असतात. ही जात 100 ते 110 दिवसात तयार होत असते. हेक्टरी उत्पादन २६० ते ३०० क्विंटल मिळते.
एन – ५३ : ही जात खरीप हंगामासाठी योग्य आहे आणि ११० ते १५० दिवसांत तयार होते. या जातीचा रंग लाल भडक असतो. हेक्टरी उत्पादन २०० ते २६० क्विंटल मिळते.
एन- 2-4-१ : ही जात रब्बी हंगामासाठी योग्य असून रंग भगवा व विटकरी आहे आणि कांदा आकाराने मध्यम गोल असून साठवणूकींत हा कांदा अतिशय चांगल्या प्रकारे टिकतो. ही जात ११० ते १३० दिवसांत तयार होते. हेक्टरी उत्पादन २९० ते ३७० क्विंटल मिळते.
पुसा रेड : कांदे मध्यम आकाराचे विटकरी लाल गोलाकार मध्यम तिखट असतात आणि लागवडीपासून 120 दिवसात तयार होतोत. हेक्टरी उत्पादन २३० ते २८० क्विंटल मिळते. लागवडीसाठी एकरी कांद्याचे ४ ते ४.५ किलो बियाणे लागत आवश्यक असते.
हे हि वाचा : कांदाचाळ बांधणी
लागवड
- कांदा लागवड ही वाफा पद्धतीने किंव्हा सरी पद्धतीने करू शकत आहे. पण त्याआधी कांद्याची रोपे तयार करणे महत्वाचे आहे आणि गादी वाफे तयार करून त्यामध्ये कांद्याची रोपे तयार करावीत. जेथे गादी वाफे तयार करायचे आहेत ती जमीन व्यवस्थित नांगरून व कुळवून घ्यावी व मग तिथे १ मी रूंद ३ मी लांब १५ सेमी उंच वाफे बनून घ्या. ह्या वाफयाच्या रूंदीशी समांतर अशा 5 सेमी बोटाने रेषा पाडाव्यात आणि यात बी ओळीत पातळ पेरावे व नंतर ते मातीआड करावे. बी उगवून येईपर्यंत झारीने पाणी घालावे व बी उगवल्यानंतर गरजेप्रमाणे दंडाणे पाणी द्यावे.
- रोपांना हरबर्याच्या आकाराची गाठ तयार झाली की ते लागवडीसाठी तयार आहेत असे समजावे आणि खरीप हंगामातील कांदयाची रोपे ही 6 ते 7 आठवडयांनी तर रब्बी हंगामात लागवड केलेली रोपे ही 8 ते 9 आठवडयांनी तयार होत असतात. रोपे काढण्या आधी २४ तास गादी वाफयास पुरेसे पाणी देऊन घावे.
- त्यानंतर रोपे काढून ती वाफा पद्धतीने किंव्हा सरी पद्धतीने लावावीत आणि सपाट वाफा दोन मीटर रूंद व उताराप्रमाणे वाफयांची लांबी ठेवावी. रोपांची लागवड १२.५ बाय ७.५ सेमी अंतरावर करावी आणि सपाट वाफयामध्ये हेक्टरी रोपांचे प्रमाण जास्त असले तरी मध्यम आकाराचे एकसारखे कांद्याचे उत्पादन मिळते.
खते व पाणी व्यवस्थापन
कांदा पिकास हेक्टरी 50-६० किलो नत्र, 50 किलो स्फूरद व 50 किलो पालाश लागवडीच्या वेळी घ्यावे. त्यानंतर 1 महिन्याने 50 किलो नत्र प्रति हेक्टरी दिले पाहिजे. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्वाचे असते आणि खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्या अंतराने तर उन्हाळी रब्बी हंगामात 6 ते ९ दिवसांनी गरजेनुसार पाणी द्यावे.
आंतरमशागत
रोपांच्या लागवडीनंतर शेतात तण दिसल्यास हलकी खुरपणी करावी आणि काढणीपूर्वी 3 आठवडयांअगोदर पाणी बंद करावे म्हणजे पानातील रस कांद्यामध्ये लवकर उतरतो आण माना पडून कांदा काढणीस तयार होत असतो
रोग व कीड
कांदयावर करपा, फूलकिडे अशा रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव आढळत असतो. करपा रोगामुळे कांदा पातीवर लांबट गोल तांबूस चटटे पडतात व शेंडयापासून पाने जळाल् यासारखी दिसत असतात. फूलकिडे कांदा पातीवरील तेलकट पृष्टभागात खरडतात व त्यात स्त्रवणारा रस शोषतात आणि त्यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात.
उपाय
- फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी लागवडी नंतर दोन तीन आठवडयांनी खालील फवारणी करून घ्या:
- प्रती हेक्टरी फॉस्फॉमिडॉन 85 डब्ल्यू.एस.सी. 100 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 600-६५० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यू एस.सी. 550-६०० मिली अधिक डायथेन एम 45, 75 डब्ल्यू. पी. 1250 ग्रॅम किंवा डायथेन झेड – 78, 75 डब्ल्यू डी पी 1000 ग्रॅम अधिक 500 ग्रॅम सॅडोवीट चिकट द्रव्य 500-५५० लिटर पाण्यात मिसळून पाहिली फवारणी करावी.
- पहिल्या फवारणी नंतर तीन चार आठवडयांनी खालील प्रमाणे दुसरी फवारणी करावी:
- प्रती हेक्टरी फॉस्फोमिडॉन 85 डब्ल्यू.एस.सी. 100 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी ६००-६५० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यू. एस.सी. ५५०-६०० मिली अधिक कॉपर ऑक्झिक्लोराईड 50 डब्ल्यू. पी. १२००-१३०० ग्रॅम किंवा डायिन झेड 78, 75 डब्ल्यू.डी. पी. 1000 ग्रॅम ५००-५५० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
कांद्याची काढणी व उत्पादन
लागवडीनंतर ३ ते ४.५ महिन्यात कांदा काढणीस तयार होत असतो. कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो व पात आडवी पडत असते. ६० ते ७० टक्के पिक अशा अवस्थेत आले की कांदा काढणीस आला आहे हे ओळखणे सोपे जाते. मग कुदळीच्या मदतीने आजूबाजूची जमिनी सैल करून कांदे उपटून काढून घावे . काढणीनंतर ४, ५ दिवसांनी कांदा पातीसकट शेतात लहान लहान ढिगा-याच्या रूपाने ठेवत असतात. नंतर कांदयाची पात व मुळे कापावे आणि पात कापताना 3 ते 4 सेमी लांबीचा देठ ठेवून पात कापावी. यानंतर कांदा 4 ते 5 दिवस सावलीत सुकवावा. हेक्टरी उत्पादन २४० ते २९० क्विंटल मिळते.