देशातील अनेक राज्यात लोडशेडिंगचा प्रश्न चढ्याभावाने वीज घेण्याचा सरकारचा प्रयत्न ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे - डिजिटल शेतकरी

देशातील अनेक राज्यात लोडशेडिंगचा प्रश्न चढ्याभावाने वीज घेण्याचा सरकारचा प्रयत्न ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

मिरी / केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील गुजरातसह इतर अनेक राज्यात लोडशेडिंगचा प्रश्न निर्माण झालेला असून कोळशाच्या खाणी केंद्र सरकारच्या मालकीच्या असल्याकारणाने  राज्याला कोळसा कमी प्रमाणात मिळत असुन  लोडशेडिंग करण्याची वेळ महावितरणवर येत असली तरी राज्य सरकार चढ्या भावाने देखील वीज खरेदी करण्याच्या तयारीत असून दोन-तीन दिवसात यावर निश्‍चितपणे मार्ग काढला जाईल व लोडशेडींग पूर्णता कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला आहे. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे मिरी तिसगाव या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी मंत्री तनपुरे यांच्या माध्यमातून सुमारे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन मंत्री तनपुरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दिलेल्या डिजिटल बोर्डचे देखील लोकार्पण मंत्री तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बाजारतळ परिसरात झालेल्या जनता दरबारात प्रसंगी उपस्थित जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करतांना  मंत्री तनपुरे म्हणाले मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे विकास कामासाठी राज्य सरकार टेंडर काढत नव्हते परंतु आता परिस्थिती सुधारली असून मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन स्वतःच्या नावाच्या पाट्या रंगवण्याला महत्व न देता जनतेच्या गरजा ओळखून त्यानुसार खर्‍या अर्थाने निधी उपलब्ध करून दिला जात असून सभामंडप हायमॅक्सला माझ्याकडून निधी कमी मिळेल परंतु रस्ते वीज पाणी या कामासाठी मात्र 70 ते 80 टक्के निधी प्राधान्याने देण्याचे काम केले जात आहे. गेल्या काही दिवसापासून ओव्हरलोडमुळे मिरी सबस्टेशनचा मोठा लोड वाढला असुन हा लोड कमी करण्यासाठी शिराळ येथे देखील नवीन सबस्टेशनला मंजुरी देण्यात आली असून त्या ठिकाणी नवीन सबस्टेशन झाल्यानंतर मिरी परिसराचा विजेचा प्रश्न मार्गी लागेल. मेरी तिसगाव रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली होती या रस्त्याच्या कामासाठी देखील मोठा निधी उपलब्ध केला असल्याने मिरी व तिसगाव या दोन्ही गावच्या नागरीकांचा महत्त्वाचा प्रश्न या रस्त्यांच्या कामामुळे मार्गी लागणार आहे. वाडी-वस्तीला जोडणारे इतर रस्ते देखील खुले करण्यासाठी तहसीलदार, प्रांतांधीकारी यांना माहिती घेऊन रस्त्याचे प्रश्‍न सोडवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. मिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये पंचवीस लोकांनी अर्जाद्वारे आपले प्रश्न मांडले त्यापैकी बहुतांश प्रश्नांची मंत्री तनपुरे यांनी अधिकाऱ्यांच्या समोरच सोडवणूक केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, पं स सदस्य राहुल गवळी, माजी सभापती संभाजी पालवे, माजी उपसभापती महादेव पाटील कुटे, युवानेते भाऊसाहेब लवांडे, सुभाष गवळी, आदिनाथ सोलाट, एकनाथ झाडे, राजू शेख, जगदीश सोलाट,भागिनाथ गवळी, सरपंच रवींद्र मुळे, जगन्नाथ लोंढे, माणिक लोंढे, शिवसेनानेते राजेंद्र म्हस्के, भारत वांढेकर, पंकज मगर, मनोज म्हस्के, महेश लवांडे, अशोक दहातोंडे, अजय पाठक, विष्णू सोलाट बद्रीनाथ सोलाट तहसीलदार शाम वाडकर, उपअभियंता बडे यांच्यासह विविध विभागाचे शासकीय कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

Leave a Comment