औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने उसंत घेतली आहे आणि पावसाची ही उघडीप व झालेले सूर्यदर्शन पिकांसाठी पोषक ठरण्याची शक्यता आहे. जवळपास आठवडाभरापासून मराठवाड्यातील (Marathawada Rain) औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत पावसाची जोरदार हजेरी सुरू होती.
बीड, लातूर, उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांतील काही भागांत पावसाचा जोर अधिक राहिला होता . आठवडाभरात सतत ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शनही झाले नव्हते. शुक्रवारी (ता.१५) मात्र अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४९ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला आहे.१६ मंडलांकडे पावसाने पाठ फिरवली आहे आणि सोयगाव तालुक्यातील सावलदबारा मंडळात झालेला २२.८ मिलिमीटर पाऊस दखलपात्र राहिला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २१ मंडलांकडे पावसाने पाठ फिरवली, तर २८ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला आहे.
बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ३४ मंडलांत पावसाचा टिपूसही बरसला दिसत नाही. तर २९ मंडलांत पावसाची तुरळक हजेरी लागली आहे आणि लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ७ मंडलांत पावसाचा थेंबही पडला नाही. तर चाकूर व लातूर तालुक्यांत काही मंडलांत हलका मध्यम पाऊस पडला आहे. इतरत्र पावसाची हजेरी तुरळकच राहिली आहे.
उस्मानाबादमध्ये उघडीप
उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ११ मंडलांत पावसाचा थेंबही पडला नाही. उर्वरित ३१ मंडलांत तुरळक पावसाची हजेरी लागली आहे आणि इतर तालुक्यात पावसाचा टिपूसही बरसला नाही.