Monsoon Update : दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता वर्तविली आहे.मॉन्सूनने सोमवारी (ता. ९) बहुतांश महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. विदर्भ आणि कोकणाचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून परतला आहे आणि त्यानंतर मॉन्सूनची परतीची वाटचाल काहीशी अडखळली आहे.Monsoon Update
मॉन्सून परतल्यानंतर राज्यात बहुतांश भागात उष्ण व कोरडे हवामान झाले आहे तसेच गुरुवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
उन्हाचा चटका कायम असतानाच, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे आणि आज (ता. १३) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
तेलंगणा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तसेच उत्तर बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे आणि तमिळनाडूतील चक्राकार वाऱ्यांपासून कोमोरिनपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
‘ऑक्टोबर हीट’चा चटका चांगलाच वाढल्याने ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम आहे तसेच गेले काही दिवस अनेक ठिकाणी सातत्याने पारा ३५ अंशांवर आहे. गुरुवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला, जळगाव, नागपूर, वाशीम येथे तापमान ३६ अंशांपुढे होते. आज (ता. १३) राज्यात मुख्यतः उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविला आहे.
गुरुवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३४.७, जळगाव ३६.२, कोल्हापूर ३२.६, महाबळेश्वर २६.४, नाशिक ३३.७, सांगली ३२.७, सातारा ३२.८, सोलापूर ३५.२, सांताक्रूझ ३३.५, डहाणू ३३.६, रत्नागिरी ३३.५, छत्रपती संभाजीनगर ३४.२, परभणी ३५.७, अकोला ३७.२, अमरावती ३५, बुलडाणा ३३.२, ब्रह्मपुरी ३५.८, चंद्रपूर ३५, गडचिरोली ३४.८, गोंदिया ३४.९, नागपूर ३६.१, वर्धा ३५.५, वाशीम ३६, यवतमाळ ३५.७.Monsoon Update