शेळ्या-मेंढ्यांमधील फॉल्स गिड रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्याच्या दिवसातील वातावरण हे विविध कीटकांच्या (Insect) उत्पत्तीसाठी अत्यंत अनुकूल असल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या माशा (Flies) आणि डासांचा उपद्रव (Mosquito) जास्त प्रमाणात आढळून येत आहे. त्यामध्ये काही माशा चावा घेणाऱ्या तर काही शरीराच्या विविध भागात अंडी घालून उपद्रव करणाऱ्या आहे. या माशांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांत विविध आजारांची बाधा होण्याची शक्यता आहे. (Animal Care)
ईस्ट्रस ओव्हीस प्रजातीच्या (नेझल बॉट) माशांचे कालचक्र
१) पावसाळ्यात उपद्रव करणाऱ्या विविध माशांपैकी, नाकामध्ये बाधा करणाऱ्या ईस्ट्रस ओव्हीस प्रजातीच्या (नेझल बॉट) माशांच्या प्रादुर्भावामुळे प्रामुख्याने मेंढ्या तसेच शेळ्यांमध्ये हा आजार निर्माण होत असतो. (Goat Farming)
२) ईस्ट्रस प्रजातीच्या मादी माशा शेळ्या-मेंढ्यांच्या शरीरावर न बसता किंवा न चावता तोंडाच्या समोर हवेत उडताना काही सेंटीमीटर अंतरावरून नाकामध्ये किंवा काहीवेळा डोळ्यांमध्ये पहिल्या अवस्थेतील अळ्या सोडतात आणि या अळ्या नाकामध्ये पुढे पुढे मार्गक्रमण करत असतात. नाकाच्या सायनस मध्ये पोचल्यावर अळ्यांची दुसरी व तिसरी अवस्था यांची वाढ त्यावेळच्या हवामानाप्रमाणे काही आठवडे ते काही महिन्यांत होत असते.
३) जेव्हा वातावरण उष्ण बनायला सुरवात होते तेव्हा तिसऱ्या अवस्थेतील अळ्या नाकातून बाहेर पडायला सुरवात होत असते आणि या अळ्या नाकातून बाहेर पडल्यानंतर साधारणपणे ४ आठवड्यांत प्रौढ माशी होतात आणि पुन्हा फलनानंतर मादी माशा नव्याने पहिल्या अवस्थेतील अळ्या नवीन शेळ्या-मेंढ्यांच्या नाकामध्ये सोडण्यास सुरवात करत असतात.
४) प्रौढ माशांचे आयुष्यमान हे साधारणपणे २-४ आठवडे एवढे आहे. ईस्ट्रस माशांच्या पूर्ण कालचक्रामध्ये प्रौढ माशांचा त्रास किंवा प्रादुर्भाव मेंढ्या तसेच शेळ्यामध्ये अगदी नगण्य असतो परंतु नाकामध्ये गेलेल्या अळ्या मोठा कालावधीपर्यंत वास्तव्य करत असल्यामुळे त्यापासून वेगवेगळ्या बाधा होऊ शकत असतात.
नेझल बॉट माशांच्या प्रादुर्भावाची लक्षणे ः
१) नेझल बॉट माशांच्या प्रादुर्भावामुळे मेंढ्या, शेळ्यांच्या नाकातून रक्तमिश्रीत किंवा पुमिश्रीत स्राव बाहेर येत असतो.
२) अळ्यांच्या नाकातील हालचालींमुळे व चाव्यामुळे बाधित शेळ्या,मेंढ्यांना शिंका येत असतात आणि त्याचबरोबर खोकला येतो.
३) शिंकताना बाहेर पडलेल्या स्रावाबरोबर पिवळसर पांढऱ्या किंवा तपकिरी रंगाच्या अळ्या सापडत असतात.
४) शिंका आणि खोकल्याने बेजार होऊन श्वसनास त्रास होतो आणि त्यामुळे बाधित पशूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन उत्पादकता कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन बाधित पशूंमध्ये श्वसनसंस्था व इतर आजारांची लागण होणे.
५) नाकातील अळ्यांच्या चाव्यामुळे, प्रादुर्भावामुळे तसेच तोंडासमोर घोंगावणाऱ्या माशांमुळे बाधित पशूंचे चरण्यावर लक्ष लागत नाही, उपासमार वाढते आणि त्यामुळे शरीरयष्टी खालावते.
हे हि वाचा : बंदिस्त शेळीपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर 2022
फॉल्स गिड या आजाराची लक्षणे ः
१) काही वेळा नाकातील ईस्ट्रस माशांच्या अळ्या विसंगतपणे नाकातून पुढे सायनसची हाडे त्याचप्रमाणे कवटीच्या हाडांना इजा करून मेंदूमध्ये प्रवेश करत असतात.
२) ईस्ट्रस माशांच्या अळ्यांनी मेंदूस इजा केली तर अशा बाधित मेंढ्या-शेळ्यांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येतात आणि मेंदूस झालेली इजा प्राणघातक ठरू शकते. अशा प्रकारच्या मेंदू बाधेस ‘फॉल्स गिड’ असे संबोधले जात असते.
३) फॉल्स गिड या आजारामध्ये बाधित मेंढ्या व शेळ्यांमध्ये चालताना तोल जाणे, अडखळत चालणे, चक्कर येणे, निर्जीव वस्तूवर डोके व नाक घासणे आणि गोल गोल फिरणे इत्यादी लक्षणे दिसून येत असतात.
४) तीव्र बाधा झाल्यास मेंढ्या व शेळ्या आडव्या पडतात, हातपाय झाडतात, तोंडातून फेस येतो, ओरडतात आणि बेशुद्ध पडतात आणि त्यानंतर बाधित शेळ्या,मेंढ्या दगावत असतात.
५) ज्या बाधित मेंढ्या व शेळ्यांमध्ये मेंदूशी निगडित लक्षणे दिसून येतात, त्यावर उपचार करूनही फारसे यश येत नाही त्यामुळे मज्जासंस्था बाधित होऊन त्या मृत्यूमुखी पडतात.
नेसल बॉट माशांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय योजना ः
१) शेळ्या,मेंढ्यांना चरावयास सोडताना त्यांचा भोवती माशांचा प्रादुर्भाव आहे की नाही याचे नियमित निरीक्षण करत राहावे.
२) शेळी, मेंढीचा गोठा व परिसर नियमित स्वच्छ, कोरडा ठेवण्यात यावा.
३) पावसाळ्याच्या दिवसांत माशा तसेच इतर परजीवींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास गोठा तसेच शेळ्या-मेंढ्यांची पशुवैद्यकांच्या सल्ल्याने शिफारशीत औषधाची फवारणी करून करावी.
४) पावसाळ्यानंतर किंवा जास्त पाऊस पडून नंतर वातावरण जास्त उष्ण झाल्यास माशांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी कीटकनाशक औषधाची परिसरात फवारणी करणे फायद्याचे ठरत आहे.
५) कळपातील एक किंवा अधिक शेळ्या-मेंढ्यामध्ये नेझल बॉट माशांच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसून आल्यास कळपातील इतर निरोगी शेळ्या-मेंढ्यामध्ये माशांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुवैद्यकांकडून योग्य प्रतिबंधात्मक उपचार करून घेतले पाहिजे.
1 thought on “शेळ्या-मेंढ्यांमधील फॉल्स गिड रोगाचा प्रादुर्भाव आणि उपाय 2022”